धाराशिव बाणगंगा टाइम्स –
उपमुख्यमंत्री अजित पवार हे काल धाराशिवमध्ये होते. माहायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या विजयासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. अर्चना पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी देखील अजित पवार हजर होते. त्यानंतर अजित पवार यांनी धाराशिवमधील पाटील यांच्या निवासस्थानी माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांची भेट घेतली आहे.
धाराशिवमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्यापूर्वी अजित पवार यांनी सुरेश बिराजदार यांना लोकसभेसाठी तयारी करण्याचे आदेश दिले होते. मात्र ठाकरे गटाने धाराशिव मधून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे ऐनवेळी राष्ट्रवादीकडून सुरेश बिराजदार यांच्या ऐवजी अर्चना पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे सुरेश बिराजदार थोडेशे नाराज होते. आजच्या भेटीत अजित पवार यांनी बिराजदार यांची नाराजी दूर केली आहे. तसेच लोकसभे ऐवजी विधानपरिषदेवर संधी देऊ असे सांगत आमदारकीचे आश्वासन दिले आहे. अस करून अजित पवार यांनी एकप्रकारे डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, धाराशिव येथील ठाकरे गटाचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर हे कडवे शिवसैनिक असून गेल्या पाच वर्षात त्यांनी चांगला जनसंपर्क तयार केला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राणाजगजितसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकर आमने-सामने होते. या निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांनी राणा पाटील यांचा दारुण पराभव केला होता. त्यामुळे जेव्हा ठाकरे गटाकडून ओमराजे निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा ओमराजे यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पद्मसिंह पाटील यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी जाहीर केली.