धाराशिव बाणगंगा टाइम्स –
खोटा प्रचार करून विरोधकांकडून मतदारांची दिशाभूल केली जात आहे. यापेक्षा केलेल्या आरोपाचे पुरावे द्या, आणि मग बोला, असे खुले आव्हान भाजप नेते राणाजगजितसिंह पाटील यांनी पारंपारिक विरोधक असलेल्या ओमराजे निंबाळकर यांना दिले आहे. तसेच धाराशिवसाठी तुम्ही काय केले? असा सवाल देखील उपस्थित केला आहे.
धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी महायुती कडून अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर हे उभे आहेत. प्रचारा दरम्यान ओमराजे निंबाळकर यांच्याकडून राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर अनेक आरोप केले जात आहेत. यावर उत्तर देताना ते माध्यमांशी बोलत होते.
तेरणा ट्रस्ट कडून नागरिकांवर मोफत उपचार केले जात नाही.या ओमराजे निंबाळकर यांच्या टीकेला उत्तर देताना राणाजगजितसिंह पाटील म्हणाले, तेरणामध्ये एक लाखापेक्षा अधिक रुग्णांवर उपचार झालेले आहेत. त्यातील 27 हजाराच्या आसपास उपचार हे निकषात बसल्यामुळे महात्मा फुले योजनेतंर्गत केले गेले आहेत. तर तेरणा ट्रस्टच्या खर्चातून 48 कोटी रुपये खर्च करून उर्वरीत उपचार झालेले आहेत. मात्र विरोधक कोणताही पुरावा न देता खोटे आरोप करीत आहेत. त्याच्या विरोधात आम्ही इलेक्शन कमिशनकडे तक्रार केली आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले,ही निवडणूक देशाची आहे, लोकसभेची आहे.विकासावर प्रचार व्हायला पाहिजे. विकासावर चर्चा व्हायला पाहिजे. मात्र तस होताना दिसत नाही.विरोधक विद्यमान खासदार आहेत. त्यांनी आपल्या जिल्ह्याच्या विकासातही काय केले? असा जाब देखील त्यांनी विचारलं
राणाजगजितसिंह पाटील यांनी धाराशिवच्या वाट्याच मेडिकल कॉलेज हे नेरूळला नेल; या आरोपाला उत्तर देताना ते म्हणाले, मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव हा मुंबईसाठीचाच होता कारण ग्रामीण भागामध्ये डॉक्टरांची उपलब्धता तेवढी नसते मात्र, ओमराजे निंबाळकर यांनी शब्द फिरवून त्याचे चुकीचे समज प्रचारात पसरवले आहेत. म्हणूनच मी त्याला खोटारडा म्हणतो. ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्याची आहे. अशा वेळी आपल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघांमध्ये मोठे प्रकल्प कसे आणता येतील, असा विचार करा. आपल्या ज्या आकांक्षा आहेत ते आपल्याला पुढच्या पाच वर्षांमध्ये योग्य उमेदवाराच्या माध्यमातून पूर्ण करायच्या आहेत. त्यामुळे महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यानांच मतदान करा असे पाटील म्हणाले.