बेरोजगार तरूणांना खासदारांनी फसवले, जाहीरनाम्यातील एकही वचनपूर्ती नाही : विक्रम काळे

पंधरा हजार नौकऱ्या देणार होता त्याच काय झालं ?

धाराशिव बाणगंगा टाइम्स-

मागील लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील 15 हजार तरूणांना रोजगार देण्यासाठी एखादा प्रकल्प आणूनच पुढच्या वेळी मत मागायला येईन, असे वचन देणार्‍या महाविकास आघाडीच्या उमेदवाराने तरूणांना फसवले आहे. प्रत्येकवेळी फसव्या गोष्टी करणार्‍या उमेदवाराला आता मत मागण्याचा अधिकार पोहोचत नाही, असे मत राष्ट्रवादीचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

प्रतिष्ठान भवन येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपाचे लोकसभा निवडणूक प्रमुख तथा माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, माजी नगराध्यक्ष अमित शिंदे यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना आमदार विक्रम काळे म्हणाले की, आजवरच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना मतदारांनी संधी दिलेली होती. प्रत्येकवेळी जाहीर केलेला जाहीरनाम्याची पूर्तता मात्र होत नाही, ही मतदारांना खंत वाटते. मतदारांना खोटी वचने देवून निवडणूका प्रत्येकवेळी जिंकता येत नसतात. लोकसभा निवडणूक ही देशाची आहे. खासदाराने जिल्ह्याचे प्रमुख प्रश्न संसदेत मांडून जिल्ह्यासाठी एखादी खास योजना आणली असती. परंतु त्यांच्याकडून वचनपूर्ती झालेली दिसून येत नाही. तरूणांच्या बाबतीत मागील निवडणुकीत दिलेल्या वचनाची आठवण करून देण्यासाठी आमदार विक्रम काळे यांनी ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या एका भाषणाची चित्रफित माध्यमांना दाखवली. त्यात राजेनिंबाळकर यांनी जिल्ह्यातील 15 हजार तरूणांच्या हाताला काम देण्यासाठी एखादा प्रकल्प आणून दाखवीन, तरच पुढच्या निवडणुकीत मत मागायला येईन, असे वचन दिले होते. मात्र त्यांच्याकडून वचनपूर्ती झाली नसल्याचा आरोप आमदार विक्रम काळे यांनी करत मत मागायचा ओमराजेंना अधिकार राहिला नाही, असे सांगितले.

सावंतांच्या बाबतीतील शंका दूर

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला उमेदवारी मिळाली नाही, म्हणून सावंत बंधूंसह शिवसैनिकांना खंत होती. परंतु ढोकी येथे महायुतीतील प्रमुख नेतेमंडळींच्या झालेल्या बैठकीत त्यांच्या बाबतीतील शंका दूर झाली आहे. सावंत बंधू उशिरा जरी प्रचाराला आले असले तरी आपले सर्व शिवसैनिकांना महायुतीच्या विजयासाठी कामाला लागण्याचे जाहीर आवाहन केले आहे. त्यामुळे आता महायुतीचा विजय ही केवळ औपचारिका राहील, असे आमदार विक्रम काळे यांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version