विद्यमान खासदारांनी धाराशिव जिल्ह्यासाठी पाच वर्षात काय केले -आ.राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव बाणगंगा टाइम्स –
आज आपल्या भागातील जे विद्यमान खासदार आहेत. त्यांनी गेल्या पाच वर्षात धाराशिवसाठी काय केले? कोणता प्रस्ताव केंद्रात पाठवून निधी आणला? विकासकामे आपल्या भागात झाली का? त्यामुळे आपल्याला आता फक्त रडारडी, नौटंकी करण्या पलीकडे जावून काम करणारा लोकप्रतिनिधी आवश्यक आहे. फक्त वेळ मारून नेऊन आपला विकास होणार नाही, आशा शब्दात भाजप नेते राणाजगजितसिंग पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर नाव न घेता टीका केली.

अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या घडा येथील बाणगंगा साखर कारखान्यात आयोजित कर्मचारी सभेत आ.राणाजगजितसिंह  पाटील बोलत होते.

आ.राणाजगजितसिंग पाटील म्हणाले, पूर्वी आपल्या भागात साखर कारखाने नव्हते मग ते कसे आले तर डॉ. पद्मसिंह पाटील, मोटे बप्पा यांनी केलेल्या कामामुळे आज आपल्याकडे साखर कारखाने आले. शेतकऱ्यांची आर्थिक सुबत्ता आली. पुढे एक एक साखर कारखाना येथे उभा राहिला. दरम्यानच्या काळात कृष्णा खोरे प्रकल्पातील आपल्या हक्काचे  21 टीएमसी पाणी आरक्षित करण्यासाठी डॉ. पद्मसिंह पाटलांनी आपली संपूर्ण ताकद लावली. त्यांची पद्मसिंह पाटलांना खूप मोठी राजकीय किंमत मोजावी लागली. आता आपल्याला त्यातील केवळ 7 टीएमसी पाणी मिळत आहे. त्याच काम सुरू आहे. हे पाणी आता परांडा, वाशी, कळंब, तुळजापूरला मिळणार आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, पुढील काळात आपल्याला धाराशिवमध्ये मोठे उद्योग आणायचे आहेत. यासाठी या राखीव पाण्याचा उपयोग होणार आहे. कौडगाव येथे  अडीच हजार एकरची एमआयडीसी आपण विकसित करीत आहोत. तसेच सोलापूर आणि बार्शीच्या बाजूला देखील एमआयडीसी होणार आहे. यासाठी मोठा निधी आवश्यक असून केंद्र सरकारकडून सहकार्य मिळाले तर हे प्रकल्प लवकर पूर्ण होतील. त्यातून मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती ही होईल. त्यामुळे आता मतदारांनी भूमिका घेण्याची वेळ आली आहे. काम करणारे विकासपुरूष नरेंद्र मोदी यांच्या मागे उभे राहण्याची ही वेळ आहे. तेव्हा महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना मतदान करा असे आवाहनही आ.राणाजगजितसिंग पाटील यांनी केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version