जास्त हवेत उडू नका नाहीतर  एका झटक्यात ही जनता तुम्हाला जमिनीवर आणल्याशिवाय राहणार नाही- डॉ.तानाजी सावंत यांचा हल्लाबोल

bangangatimes.com

धाराशिव बाणगंगा टाइम्स-

लोकसभेच्या तिसऱ्या टप्यातील प्रचाराचा आज समारोप होत आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघात येत्या ७ मे रोजी मतदान होणार आहे. सत्ता म्हणजे ताम्रपट नसतो कोणासाठी. ती एकदाच मिळते. म्हणून सत्तेचा मान राखून काम केले पाहिजे. जास्त हवेत उडू नका. नाहीतर  एका झटक्यात ही जनता तुम्हाला जमिनीवर आणल्याशिवाय राहणार नाही, असा सल्ला शिवसेना नेते व आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी राजकारण्यांना दिला.

धाराशिव लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचार सभेत डॉ. तानाजी सावंत बोलत होते.
डॉ. तानाजी सावंत म्हणाले, आपण नेहमी राज्या बद्दल, देशा बद्दल, सीमा सुरक्षेबद्दल बोलतो. पण देश म्हणजे काय?, जनता म्हणजे काय?, रोजगार म्हणजे काय? यांची पुन्हा व्याख्या होणे गरजेचे आहे. देश हा खरा गल्ली बोळातूनच चालू होतो. येथील प्रखर पडसाद दिल्लीला सुद्धा हलवू शकतात. आपल्या देशात खेड्या पाड्यात राबणारा, शेताच्या बांधावरचा शेतकरी सुद्धा पंतप्रधान कोण होणार? हे ठरवत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे, स्थानिक जनतेचे प्रश्न हे नेहमीच महत्वाचे असतात. हे प्रश्न सोडवण्यासाठी शासन दरबारी जनतेचे प्रश्न मांडणारा आणि शासकीय तिजोरीतून निधी आणणारा लोकप्रतिनिधी जनतेला हवा असतो. तो खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी असतो. त्यामुळे राजकुमारासारख न जगता जनतेच्या सेवकांप्रमाणे काम केलं पाहिजे. राजकारणात यायच असेल तर समाजसेवक म्हणून या असा सल्ला तानाजी सावंत यांनी ओमाराजे निंबाळकरांना नाव न घेता दिला. 

पुढे बोलताना डॉ.तानाजी सावंत म्हणाले, वाशी शहरात दोनशे कोटींची काम सुरू आहेत. त्यात वाशी नगरपरिषदेची भर आपल्याला घालायची आहे. मात्र, स्थानिक राजकारणामुळे हा 80 कोटी रुपयांचा प्रस्ताव आज धुळखात पडला असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Share This Article
Leave a comment