धाराशिव बाणगंगा टाइम्स –
लोकसभेच्या तिसऱ्या टप्यात मतदान होत असलेल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघात रविवारी महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचाराचा समारोप झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोणताही भेदभाव न करता अल्पसंख्याक समाजाचा विकास केला आहे. त्यामुळे अल्पसंख्यांक समाज महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असा विश्वास राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ धाराशिव येथे अल्पसंख्यांक समाजाचा मेळावा घेण्यात आला. यावेळी मुश्रीफ बोलत होते. मेळाव्यास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, राज्यातील जनता आपल्याला चांगली ओळखते. आपण कधीही समाजामध्ये भेदभाव केला नाही. मुस्लिम बहुल भागात व जिथे गरज आहे, अशा दोन्ही जागी शादीखान्यासाठी आपण प्रत्येकी पाच कोटी रुपये दिले आहेत. शेतीमुळे ग्रामीण भागात पाण्याची मागणी जास्त आहे, त्याला हजारो कोटी रुपयांचा निधी लागतो. केंद्र व राज्य सरकारकडून निधी आणण्यासाठी आपल्याला हक्काचा खासदार पाहिजे. आपल्या लोकसभा क्षेत्रात विकासाची गंगा प्रवाहित करण्यासाठी मोदी सरकारच्या विचारसरणीला अनुकूल लोकप्रतिनिधी निवडून देण्याची आवश्यकता आहे.
राज्यातही आपल्या विचाराचे सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठबळ देण्यासाठी धाराशिव लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना प्रचंड बहुमतांनी निवडून द्यावे असे आवाहन मुश्रीफ यांनी केले.