धाराशिव बाणगंगा टाइम्स –
धाराशिव परिसर हा दुष्काळग्रस्त भाग असून शाश्वत पाण्यासह रोजगार निर्मिती हा येथील प्रमुख प्रश्न आहे. केंद्राच्या विचारांचा खासदार आपल्या परिसरातून गेला तर हे प्रश्न सोडवले जाऊ शकतात. त्यामुळे आमचा लढा हा धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आहे, या भागांचा सर्वांगीण विकासाचे हे स्वप्न पूर्ण होईपर्यंत तो लढा चालूच राहणार, असा निर्धार भाजप नेते आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.
औसा येथे महायुती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राणा जगजितसिंह पाटील बोलत होते. याप्रसंगी आमदार अभिमन्यू पवार, माजी आमदार बसवराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना राणा जगजितसिंह पाटील म्हणाले, खासदाराचं काम काय असतं? तर केंद्र सरकारचा मोठा प्रकल्प आपल्या भागात आणणं. केंद्र सरकारच्या निधीतून आपल्या विभागाची विकास काम करून घेणे, काही अडचणीचे विषय केंद्राशी संबंधित असतील तर आपले प्रश्न संसदेत मांडून ते प्रश्न सोडवून घेणे. या तीन पैकी आपल्या मतदारसंघात कुठलं काम विद्यमान खासदारांनी केले आहे? याबाबतीत चर्चा होणे गरजेचे आहे. या भागात आपल्याला एमआयडीसी आणायची आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा विषय आहे, तो म्हणजे शाश्वत पाण्याचा आणि हे पाणी आपल्याला कोण आणून देईल तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. हे आपल्या राज्याचे प्रतिनिधी केंद्र सरकारशी बोलून म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मदतीने आपल्या विभागात शाश्वत पाण्याचा प्रश्न सोडवू शकतात. यासोबतच थोडा पुढचा विचार करू सांगली व कोल्हापूरच्या पुराचं पाणी 100 किलोमीटरच्या बोगदा करून दुष्काळी भाग असलेल्या धाराशिव आणि मराठवाड्याच्या पट्ट्यात शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी आणायचं आहे. म्हणजे एकीकडे शाश्वत पाणी आणि दुसरीकडे उद्योग, रोजगार निर्मिती आणि त्या माध्यमातून आपल्या भागातील अर्थकारणाला चालना देणे हे महत्त्वाचं आहे. हे सगळं नरेंद्र मोदी यांच्यामुळे शक्य होणार असल्याचे पाटील यांनी नमूद केले.
पुढे बोलताना ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षात अर्थकारणाबाबत जी रणनीती आखली ज्यामुळे आपली अर्थव्यवस्था आठव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर गेली आहे. पुढच्या पाच वर्षात आपल्याला आपली देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर नेऊन ठेवायचे आहे.
तसेच अवकाळी पावसाने झालेल्या शेतीच्या नुकसान भरपाई बाबाबाद बोलताना पाटील म्हणाले, अवकाळी पावसामुळे आपल्या भागात देखील अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. राज्य सरकारने याची दखल घेतली असून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. कॅबिनेटने सोयाबीनच्या बाबतीत साडेचार हजार कोटी रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला असल्याचेही पाटील यांनी सांगितले.